पुणे,दि.११ : – विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकांकडून अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या व फुटपाथवरील अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने पोलिसांनी मोठी कारवाई हाती घेतली. दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-०७) सोमनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने धडक मोहीम राबवली.

या मोहिमेत ७ पोलीस निरीक्षक, ८ सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक आणि ७८ पोलीस कर्मचारी सहभागी होते. कारवाईदरम्यान ५ टेम्पो, ५ टपऱ्या, १० हातगाड्या तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी एकूण ७० जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच ११ फेब्रुवारी २०२६ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन व पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने पुन्हा संयुक्त कारवाई करण्यात आली. ३० हून अधिक फेरीवाले, हातगाडीवाले व पथारीवाल्यांवर कारवाई करून ३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई दत्त मंदिर चौक, निको गार्डन चौक, बजाज फिनसर्व्ह परिसर, पुणे नागरी विमानतळ ते लॉ कॉलेज चौक, शुभ गेटवे सोसायटी, मंत्री आयटी पार्क व खराडी बायपास चौक या भागांत करण्यात आली. पुढेही विमानतळ पोलिसांकडून अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या व फुटपाथ अतिक्रमणाविरुद्ध नियमित कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही मोहीम पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त सोमनाथ मुंडे व सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.











