पिंपरी चिंचवड, दि.१४ :- पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी शिवाजी कदम यांच्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी कारवाई केली आहे. जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराशी संबंधित दोन तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी त्यांनी सुरुवातीला १० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर पडताळणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्याने तडजोडीअंती ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.




























