पुणे ग्रामीण,दि.१३:- पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीतील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे आणि इतर हत्यारांसह सुमारे १४ लाख ८७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणी प्रवरा (जि. अहिल्यानगर) येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोळवाडी परिसरात दिसून आली होती. वाहनाचा शोध घेत असताना वाहन मालकाच्या नातेवाईकांनी संशयितांना विचारणा केली असता वाद निर्माण झाला. यावेळी “चोर-चोर” असा आरडाओरडा झाल्याने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आणि दोन आरोपींना पकडण्यात यश आले, तर चार आरोपी पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी आणि डिंगोरे परिसरातील नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. सुमारे सहा तासांच्या पाठलागानंतर डोंगर-दरी परिसरातून उर्वरित चार आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्यांच्यावर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांमध्ये दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, चोरी आणि वाहन चोरीचे एकूण २० गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. या कारवाईत स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.



























