पिंपरी, दि. २१ :- पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर तातडीने प्रतिसाद देऊन अडचणींचे त्वरित निराकरण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व विक्रांत बगाडे तसेच सर्व संबंधित विभागप्रमुख व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील पूर, अतिवृष्टी, आग, इमारत दुर्घटना व इतर नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम केली असून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात इन्सिडेंट कमांडर आणि सब-इन्सिडेंट कमांडर नियुक्त करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांवर आपत्तीपूर्व तयारी, संवेदनशील भागांचे सर्वेक्षण, मनुष्यबळ व यंत्रसामग्रीची उपलब्धता, विविध विभागांतील समन्वय, शोध व बचाव कार्याचे नेतृत्व, नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, पायाभूत सुविधांची तांत्रिक पाहणी तसेच आपत्तीनंतर पुनर्स्थापना कामांचे नियोजन व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून, या व्यवस्थेमुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसादाचा वेग वाढून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे अधिक प्रभावी संरक्षण होणार आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरातील पाणी साचणे, नाले तुंबणे व पूरस्थिती निर्माण झालेल्या संवेदनशील ठिकाणांची सखोल पाहणी करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणांवर सातत्याने पाहणी करून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक अधिकार व जबाबदाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, स्थानिक स्तरावर तातडीने निर्णय घेऊन जलद प्रतिसाद देता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.पाणी साचणे किंवा पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. नाल्यांमधील अडथळे दूर करणे, जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करणे, आवश्यक त्या ठिकाणी डी-वॉटरिंग पंप उपलब्ध ठेवणे तसेच संबंधित विभागांमध्ये समन्वय राखून तातडीने कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी ‘आपदा मित्र’ यांची विविध संवेदनशील ठिकाणी नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांना तातडीने मदत करणे, प्रशासनाशी समन्वय साधणे आणि बचावकार्यात सहकार्य करणे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
महानगरपालिकेचा अग्निशमन विभागही पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आला आहे. शहरातील सर्व १० अग्निशमन केंद्रांवरील अधिकारी व कर्मचारी २४ तास सतर्क असून, रेस्क्यू बोटी, लाइफ जॅकेट, लाइफ बॉय, दोरखंड, डी-वॉटरिंग पंप तसेच अत्याधुनिक बचाव साहित्य उपलब्ध ठेवण्यात आले आहे. पाणी साचणे, पूरस्थिती, झाडे पडणे, भिंती कोसळणे अथवा नागरिक अडकून पडल्याच्या घटनांमध्ये तातडीने मदत व बचावकार्य करण्यासाठी विशेष पथके सज्ज आहेत.शहरातील पर्जन्यमानासह पवना धरण परिसरातील पावसाच्या नोंदींवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून धरणातून होणारा विसर्ग, नदीपात्रातील पाणीपातळी आणि त्याचा शहरावर होणारा संभाव्य परिणाम याचे नियमित विश्लेषण केले जात आहे. पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना वेळेत पूर्वसूचना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे.
महानगरपालिकेचा पूर नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून अग्निशमन, आरोग्य, यांत्रिकी, विद्युत, पाणीपुरवठा तसेच इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
पावसाळ्यात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता महानगरपालिकेच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. पाणी साचणे, झाड पडणे, पूरस्थिती किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन घटना आढळल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष, जवळच्या अग्निशमन केंद्राशी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. सर्व विभागांनी समन्वयाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांना त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी आणि कोणत्याही परिस्थितीत निष्काळजीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.




























