पुणे,दि.२५ : – शहरातील सर्व वाहनधारकांना वाहतूक नियमभंगाबाबत प्रलंबित असलेले दंड (ई-चलन) तातडीने भरण्याचे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. ज्यांच्या वाहनांवर दंड प्रलंबित आहे, अशा वाहनमालकांना अधिकृत नोटीस देण्यात येणार असून संबंधितांनी ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरावी, असे कळविण्यात आले आहे.
निर्धारित मुदतीत दंड न भरल्यास संबंधित चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याबाबत प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) पाठविण्यात येईल. तसेच संबंधित चलनाचा खटला न्यायालयात दाखल करण्याचीही कारवाई केली जाईल, असा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
ही नोटीस वाहनमालकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर MHPECH-G या अधिकृत शॉर्ट कोडवरून SMS द्वारे पाठविण्यात येणार आहे. २६, २७, २८ फेब्रुवारी २०२६ व १ मार्च २०२६ या कालावधीतच अधिकृत संदेश पाठवले जातील. या कालावधीव्यतिरिक्त वाहतूक पोलिसांच्या नावाने दंड भरण्याबाबत येणारे कोणतेही संदेश संशयास्पद समजावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दंड भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ https://mahatransportechallan.gov.in�, Pune Traffic Police (PTP) App किंवा जवळच्या वाहतूक विभाग कार्यालयातील ई-चलन मशीनवरील QR कोड, डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे रक्कम भरता येणार आहे.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नागरिकांना काही सूचना दिल्या आहेत. कोणतीही APK फाईल पाठवली जाणार नाही, OTP कुणालाही शेअर करू नये, केवळ अधिकृत पेमेंट पद्धतीच वापरावी आणि संशयास्पद लिंक किंवा कॉल आल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेचा उद्देश नागरिकांना नियमपालनासाठी प्रवृत्त करणे, प्रलंबित दंडाची पारदर्शक वसुली करणे आणि शहरातील वाहतूक शिस्त अधिक सक्षम करणे हा असून, पुणेकरांनी सहकार्य करून मुदतीत दंड भरावा, अशी नम्र विनंती वाहतूक पोलिसांनी केली आहे.











