पुणे,दि.१८ :- पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ ने धाडसी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करून संभाव्य खुनाचा कट उधळला आहे. १० फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपींनी एका व्यक्तीचा खून करण्यासाठी शस्त्राची व्यवस्था केल्याचे उघड झाले.
पर्वती पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान संतोष उर्फ भावड्या सांबुळे याच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याच्या साथीदारांनी गणेश एण्णे याच्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यासाठी सागर उर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव (वय २५, रा. डांडेकर पूल परिसर, पुणे) याच्याकडून गावठी पिस्तूल मागविण्यात आले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून डांडेकर पूल परिसरातून संशयिताला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा सुमारे ३५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपीने बदला घेण्यासाठी शस्त्र आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईमुळे संभाव्य रक्तपात टळला असून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पर्वती पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घोडके, सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक व खंडणी विरोधी पथक-१ च्या अधिकाऱ्यांनी केली.












