पिंपरी, दि. ८ जुलै २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो येथे दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये अंदाजे २३ नागरिक अडकले होते. त्यातील सुरुवातीस ५ नागरिक सुखरुप बाहेर आले. इमारतीत अडकलेल्या उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ), भारतीय सेना दल, महापालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या बचावकार्य राबविले. शर्तीच्या प्रयत्नानंतर इमारतीत अडकलेल्या ६ नागरिकांना सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित अंदाजे १२ नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बचावकार्यादरम्यान बाहेर काढलेल्या नागरिकांना पुढील उपचारार्थ महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसेच नजिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे प्रत्यक्ष उपस्थित असून सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.
सध्या अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व उपलब्ध मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे. अग्निशमन विभागाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ) चे जवान तसेच वैद्यकीय पथके घटनास्थळी कार्यरत असून, जेसीबी आणि इतर आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे आणि अडकलेल्या नागरिकांच्या बचावकार्याचे काम सुरू आहे.
यावेळी गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात गेल्या २ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यात कचऱ्याचा ढीग वाहून इमारतीवर कोसळल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये अडकलेल्या २३ नागरिकांपैकी ५ नागरिक सुरुवातीला बाहेर पडले. उर्वरित अडकलेल्या १८ नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू होते, यामध्ये ६ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अंदाजे १२ नागरिकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू असून आत अडकलेल्या ३ नागरिकांसोबत संवाद सुरू आहे. त्यांच्या पायावर मलबा पडला असल्याने तो हटवून त्यांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय इतर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. निश्चितपणे त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहे. सकाळपर्यंत हे बचावकार्य पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
*बचावकार्यात सुखरुप बाहेर पडलेल्या व्यक्तींची नावे -*
सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंह यांना बचावकार्यादरम्यान सुखरुप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. तर अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार, श्री बाला हे घटना घडल्यानंतर सुखरुप बाहेर पडले.



























