पुणे,दि.२३ :-प. पू. श्री नारायण महाराज (अण्णा) यांच्या कृपाशीर्वादाने आणि प. पू. टेंबे स्वामी महाराज यांच्या आधिपत्याखाली बुधवारी (दि. २९ जुलै) श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे गुरुपौर्णिमेनिमित्त एकदिवसीय भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला राज्यभरातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि देवस्थान समितीच्या वतीने व्यापक नियोजन करण्यात आले असून बुधवारी (दि. २२) विशेष समन्वय बैठक पार पडली.
या बैठकीत भाविकांची सुरक्षितता, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, वाहतूक नियंत्रण, विद्युतव्यवस्था, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सासवड नगरपालिकेकडून अग्निशमन दल, पिण्याच्या पाण्याचे टँकर, मोबाईल शौचालये आणि फॉगिंग यंत्रणेची सुविधा पुरवली जाणार आहे. विविध विभाग परस्परसमन्वयाने काम करतील, अशी माहिती प्रभारी गटविकास अधिकारी अविनाश थोरात यांनी दिली.
*तब्बल २० तास चालणार धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल*
दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसभरातील कार्यक्रमांचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:
• *पहाटे ४ ते ६:* एकमुखी व त्रिमुखी दत्तमूर्ती आणि श्री नारायणेश्वर (महादेव) मंदिरात रुद्राभिषेक.
• *सकाळी ६ ते ८:* नारायण महाराज समाधिस्थळी रुद्राभिषेक व काकड आरती.
• *सकाळी ८.३० ते १०.३०:* मुख्य आरती आणि होमहवन.
• *सकाळी ११ ते १२:* दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत, व्यासपूजन आणि दुपारी १२ वाजता सद्गुरू श्री अण्णा महाराजांच्या पादुकांचे पूजन.
• *दुपारी १२ नंतर:** मान्यवरांचे मनोगत, श्री ढंगे स्वामी महाराजांचे प्रवचन व मार्गदर्शन आणि आरती.
• **दुपारी २.३० ते ५* :*सामुदायिक दर्शन.
• *सायंकाळी ५ ते ७:* शिष्यांसाठी गुरुपूजन.
• *रात्री ८ ते १०.३०* मुख्य आरती, पालखी सोहळा (रात्री ८.३० ते १०) आणि रात्री १०.३० वाजता शेजारतीने सोहळ्याची सांगता.
*महाप्रसादाची सोय:* भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर
पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग आणि आपत्कालीन व्यवस्थेवर भर देण्यात आला.
या सोहळ्याच्या सर्व नियोजनाचा आढावा प. पू. टेंबे स्वामी महाराज यांनी घेतला. या बैठकीस सभापती अमित झेंडे, जि. प. सदस्य हरीभाऊ लोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, ओमकार शिंदे, दादा भुजबळ, सरपंच प्रदीप बोरकर, चंद्रकांत बोरकर, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




























