पुणे,दि.१३ :-पुणे शहरात गणेशोत्सव २०२६ शांततेत व सुरळीत पार पडावा, यासाठी पुणे शहर पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ७०९ गुन्हेगारांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३(२) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
पोलिस उपआयुक्त परिमंडळ ०२ पुणे शहर यांच्या कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांच्या गुन्हे अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये बेकायदेशीर हत्यार वापरणे, दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, मारहाण करणे, बेकायदेशीर घरात घुसणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ, चोरी, दंगा, हल्ला, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, जबरी चोरीसह दुखापत, बलात्कार, जातीयवाचक भाष्य, खुनाचा प्रयत्न आणि बेकायदेशीर अतिक्रमण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
पोलीस ठाणेनिहाय कारवाईमध्ये स्वारगेट पोलीस ठाणे १००, सहकारनगर १०१, पर्वती ११५, मार्केटयार्ड ७६, बिबवेवाडी १०४, भारती विद्यापीठ १०४ आणि आंबेगाव १०९, अशा एकूण ७०९ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्हेगारांना संबंधित पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करणे किंवा वास्तव्य करणे, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे, मिरवणुकीमध्ये सहभागी होणे अथवा सार्वजनिक ठिकाणी रित्या वावरणे, तसेच सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होईल किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास सक्त मनाई आदेश देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे आणि अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आगामी काळातही परिमंडळ ०२ हद्दीतील रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांविरोधात अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारीला आळा घालण्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



























