पुणे,दि.१२ : – पुणे महापालिकेसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी जोरदार लढत सुरू आहे. अशातच “हे पुणे आहे, येथे दादा नाही फक्त अण्णा” या आशयाचे बॅनर सध्या पुणे शहरात झळकत असून, त्यामागे खासदार मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय शीतयुद्धाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मात्र हीच भावना आता पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्येही ठळकपणे दिसून येत आहे.
प्रभाग ९ मध्ये फक्त अण्णा
प्रभाग ९ मध्ये सध्या बालवडकर विरुद्ध बालवडकर अशी थेट लढत पाहायला मिळत असून, या राजकीय संघर्षापेक्षा नागरिकांची भूमिका अधिक ठाम होत चालली आहे. “इथे फक्त अण्णा” अशी भावना नागरिक खुलेपणाने व्यक्त करताना दिसत आहेत. यामागे लहू अण्णा बालवडकर यांचा लोकांमध्ये असलेला नैसर्गिक, सातत्यपूर्ण आणि आपुलकीचा वावर हे प्रमुख कारण असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.लहू अण्णा बालवडकर हे कोणताही गाजावाजा न करता गावभेट दौरे, घराघरांत जाऊन संवाद, नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकणे आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या जमिनीवरच्या कामामुळे नागरिकांमध्ये “हा आपल्यातलाच माणूस आहे” अशी भावना अधिक दृढ झाली आहे.
अण्णाच आमचे नगरसेवक’ अशी लोकांची भावना
विशेष म्हणजे, आगामी एका वर्षात प्रभागात ठोस विकासकामे प्रत्यक्षात दिसतील, असा विश्वास लहू अण्णा बालवडकर नागरिकांना देत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत केलेली ठोस आश्वासने केवळ भाषणापुरती न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने जातील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.राजकीय गटबाजी, नावांची लढाई किंवा वरच्या पातळीवरील संघर्षापेक्षा प्रभाग ९ मधील नागरिकांसाठी नेतृत्वाचा चेहरा अधिक महत्त्वाचा ठरत असून, “आमचे नगरसेवक म्हणजे अण्णाच” अशी भावना आता उघडपणे उफाळून येताना दिसत आहे. त्यामुळे प्रभाग ९ मधील ही लढत केवळ निवडणुकीपुरती न राहता लोकांशी जोडलेले नेतृत्व विरुद्ध राजकीय गणिते असा आशय घेत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
पुण्यात झळकणाऱ्या बॅनरची हवा प्रभाग ९ मध्ये
एकंदरीत, पुण्यात झळकणाऱ्या “फक्त अण्णा” या बॅनरची भावना प्रभाग ९ मध्ये प्रत्यक्षात उतरलेली दिसत असून, लहू अण्णा बालवडकर यांच्याकडे नागरिक एका सक्षम, विश्वासार्ह आणि विकासाभिमुख नेतृत्वाच्या रूपात पाहत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.











