पुणे,दि.१०: – कर्जाची परतफेड करण्यासाठी चुलत भावाच्याच घरात घरफोडी चोरी करणाऱ्या इसमाला मुंढवा पोलिसांनी अटक करून तब्बल २२ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.१५ वाजण्याच्या दरम्यान सर्वे नं. १४/बी, मुंढवा येथील फिर्यादीच्या राहत्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी केली होती. या चोरीत ३७७ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ किलो चांदी व सुमारे २ लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण २२,११,००० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०५(ए), ३३१(३), ३३१(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असता चोरी ही ओळखीच्या व्यक्तीकडून झाल्याचा संशय निर्माण झाला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास करत पोलिसांनी आशुतोष अशोक कासावा (वय ३८, रा. मुंढवा) याला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, १ किलो चांदी तसेच रोख रक्कम असा एकूण २२.११ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. कर्जबाजारीपणामुळे पैसे उभे करण्यासाठी त्यानेच चुलत भावाच्या घरात चोरी केल्याचे उघड झाले.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा वासनिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
पथकात सहायक पोलिस निरीक्षक गणेश पिंगळे, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोषण, राजू कदम तसेच पोलिस कर्मचारी शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोंडे, शिवाजी धांडे, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर आणि योगेश राऊत यांनी सहभाग घेतला.












