पुणे, दि. २४ :- पुणे जिल्ह्यातील अनेक सीएनजी पंपांवर मागील महिनाभरापासून एमएनजीएलच्या पाइपलाइनमधील कमी गॅस दाबामुळे गंभीर अडचणी निर्माण झाल्या असून, पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे (PDAP) ने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या समस्येमुळे वाहनांच्या लांबलचक रांगा, वाहतूक कोंडी, सीएनजी वितरण क्षमतेत मोठी घट, डीलर्सचे मोठे आर्थिक नुकसान आणि हजारो ग्राहकांची गैरसोय होत आहे.
ही समस्या अनेक आठवड्यांपासून सुरू असतानाही एमएनजीएलने ग्राहक किंवा प्रशासनाला कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्राहकांचा रोष डीलर्सना सहन करावा लागत असून, वाहतूक कोंडीबाबत पोलीस व वाहतूक विभागाकडूनही डीलर्सनाच जबाबदार धरले जात आहे. प्रत्यक्षात ही परिस्थिती एमएनजीएलच्या कमी गॅस दाबामुळे निर्माण झाली असून त्यामध्ये डीलर्सचा कोणताही दोष नाही.
पीडीएपीने एमएनजीएलकडे तातडीने गॅसचा दाब पूर्ववत करण्याची, ग्राहकांसाठी अधिकृत प्रेस नोट जारी करण्याची तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे पोलीस आणि वाहतूक पोलिसांना ही परिस्थिती डीलर्सच्या चुकीमुळे नसून कमी गॅस दाबामुळे निर्माण झाल्याचे अधिकृतपणे कळविण्याची मागणी केली आहे.
पीडीएपीचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले,
“गेल्या महिनाभरापासून सीएनजी डीलर्सना त्यांच्या नियंत्रणाबाहेरील समस्येची किंमत मोजावी लागत आहे. आमच्या सदस्यांना मोठे आर्थिक नुकसान, ग्राहकांचा रोष आणि पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे, तर एमएनजीएल मात्र मौन बाळगून आहे. पायाभूत सुविधांतील त्रुटीची शिक्षा डीलर्सना देणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. एमएनजीएलने तात्काळ गॅसचा दाब पूर्ववत करावा, ग्राहकांसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी, प्रशासन आणि पोलीस यांना डीलर्सचा कोणताही दोष नसल्याचे अधिकृतपणे कळवावे आणि या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी.”
पीडीएपीने इशारा दिला आहे की, पुढील २४ तासांत एमएनजीएलने गॅसचा दाब पूर्ववत न केल्यास प्रभावित सीएनजी पंपांना समस्या सुटेपर्यंत सीएनजी विक्री तात्पुरती बंद करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. एमएनजीएलच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे होणारे आर्थिक नुकसान, ग्राहकांचा रोष आणि प्रशासकीय कारवाई डीलर्स अनिश्चित काळापर्यंत सहन करू शकत नाहीत.



























