रांजणगाव,दि.०६ :- रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामगाराचा खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात हमजा उस्मान शेख (वय ३९, रा. कारेगाव, साईनगर) यांचा खून झाल्याचे समोर आले. हमजा शेख हे विकास नवले यांच्या खोलीत भाड्याने राहत होते. कामावर गेलेल्या हमजा शेख यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणातून जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर त्यांना जबर मारहाण करून त्यांचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्र तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळावरील तसेच घटनास्थळाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत सार्थक संदेश कोहकडे (वय २४, रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे), अजय तोडककर (वय २६, रा. पेठ, ता. आंबेगाव, जि. पुणे), संतोष मधुकर मांजरे (वय ३७, रा. मांजरेवस्ती, ता. खेड, जि. पुणे), विठ्ठल नवनाथ पिकळे (वय २७, रा. कारेगाव, ता. खेड, जि. पुणे) आणि योगेश विलास इडोळे (वय २८, रा. शुक्रवार पेठ, वाशीम) यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून हमजा शेख यांच्या खोलीत जाऊन त्यांच्यावर हल्ला केला. लोखंडी पाइपने मारहाण करून खून केल्याचा आरोप आरोपींवर आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास रांजणगाव पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
या कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




























