पिंपरी-चिंचवड, दि१३ :-पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने शस्त्र परवान्यांबाबत कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांनी विविध कारणांमुळे १५ व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द केले असून नव्याने शस्त्र परवाना मागणाऱ्या ६८ अर्जदारांना परवाना देण्यास नकार दिला आहे.
शस्त्रांचा गैरवापर, गुन्हेगारी पार्श्वभूमी, परवाना मंजूर झाल्यानंतर विहित मुदतीत शस्त्र खरेदी न करणे तसेच परवानाधारकांचे निधन किंवा वृद्धत्व यांसारख्या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्तींविरुद्ध विविध गुन्हे नोंद असल्याचे आढळून आले.
तसेच नवीन शस्त्र परवाना मिळण्यासाठी अर्ज करणाऱ्या ६८ व्यक्तींच्या अर्जांची तपासणी केल्यानंतर त्यांना परवाना देण्यासाठी कोणतेही ठोस कारण किंवा पुरेसा आधार नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले.
भविष्यातही शस्त्र परवान्यांबाबत अशीच कठोर आणि पारदर्शक भूमिका कायम ठेवली जाणार असल्याचे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

































