पुणे,दि.१३ :-अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेत रुग्णालयांकडून औषध खरेदीबाबत होणाऱ्या सक्तीला आळा घालण्याचे आदेश जारी केले आहेत. रुग्णालयातील अंतर्गत फार्मसीमधूनच औषधे खरेदी करणे बंधनकारक नसून, औषधे कुठून खरेदी करायची हा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा मूलभूत अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना मुंढे म्हणाले की, अनेक रुग्णालयांकडून रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या फार्मसीतूनच औषधे घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी एफडीएकडे सातत्याने येत होत्या. कोणतेही रुग्णालय किंवा संस्था अशा प्रकारची सक्ती करू शकत नाही. बाहेरील मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करण्याचा निर्णय पूर्णपणे रुग्णांचा असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन आदेशानुसार, डॉक्टरांनी रुग्णांचे औषध प्रिस्क्रिप्शन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर रुग्णांना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही नोंदणीकृत मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मुंढे यांनी दिला आहे.
या निर्णयामुळे रुग्णांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार असून, औषध खरेदीतील पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




























