मुंबई,दि.४:- राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे. आगामी निवडणुकीच्या संदर्भात ही पत्रकार परिषद असल्याची माहिती समोर आली आहे. आज राज्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातील सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार, आयोगाकडून तयारी करण्यात येत आहे. राज्यातील निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. राज्य आयोगाची आज दुपारी चार वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे
अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. आज दुपारी ४ वाजता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये राज्यातील निवडणुकीची घोषणा अथवा निवडणुकीच्या तयारीचा आढवा सांगितला जाऊ शकते. नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. निवडणुकीची घोषणा होताच त्यावेळेपासून राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे.
राज्यातील निवडणुका ३ टप्प्यात होणार?
नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. एकाच टप्प्यात या सर्व निवडणुका घेता येणार नसल्याचे आयोगातील एका सूत्राने सांगितले होते. त्यामुळे राज्यात ३ टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जातो.
कधी होऊ शकते मतदान?
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान पार पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका डिसेंबरच्या मध्यपर्यंत आणि तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका जानेवारीच्या १० तारखेपर्यंत होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद होणार असल्याचे समजतेय.












