पिंपरी, दि. २: पिंपरी चिंचवड महापालिका आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने “सक्षमा” प्रकल्पांतर्गत दिवाळी काळात फराळ व विविध वस्तूंच्या विक्रीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या १७ ठिकाणी प्रदर्शने भरवण्यात आली होती. या प्रदर्शनांमध्ये शहरातील १०० हून अधिक महिला स्वयं-सहाय्यता बचत गटांनी सहभाग घेतला. या उपक्रमातून जवळपास ३ लाखांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत देण्यात आली आहे.
या प्रदर्शनांच्या माध्यमातून स्थानिक महिलांना त्यांच्या बनवलेल्या दिवाळी फराळ व उत्पादनांच्या विक्री, ब्रँडिंग व प्रसिद्धीसाठी व्यासपीठ मिळाले. त्याचबरोबर सहभागी महिलांना व्यावसायिक संधीही उपलब्ध झाल्या. या वेळी उत्पादनांच्या विक्रीची मांडणी व व्यवस्था “सक्षम” फील्ड टीम व फेडरेशन सदस्यांनी एकत्रितपणे केली. या प्रदर्शनांना स्थानिक ग्राहकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. अनेक ग्राहकांनी या महिला-निर्मित वस्तू खरेदी केल्या व त्यातील दर्जा, पॅकिंग व सादरीकरणाबद्दल कौतुक केले. तसेच यावेळी महिला स्वयं-सहाय्यता समूहांनी सोशल मीडिया, ई-कॉमर्स अशा डिजिटल माध्यमांचा वापर करून आपला व्यवसाय विस्तारण्याचा मानस व्यक्त केला आहे.












