पुणे,दि.२६ :- पुण्यातील कोंढवा परिसरात बेकायदेशीरपणे ई-सिगारेट (वेप) व वैधानिक इशारा नसलेल्या तंबाखूजन्य सिगारेटची विक्री करणाऱ्या एका तरुणावर कोंढवा पोलिसांनी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे सुपी पान टपरी, पारगेनगर, कोंढवा खुर्द येथे छापा टाकून पोलिसांनी सुमारे रुपये ४५,१८० किमतीचे विविध फ्लेवरचे वेप व तंबाखूजन्य सिगारेट जप्त केले.
या प्रकरणी रेहान आरिफ पठाण (वय २२, रा. युनिटी पार्क, कोंढवा खुर्द) याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा २०१९ तसेच सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (COTPA) कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळीस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले आणि कोंढवा पोलीस पथकाने केली.



























